मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता त्यांनी एका कार्यक्रमात मोठा गौफ्यस्फोट केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपाल करू, असे आश्वासन दिल्याचा मोठा गौफ्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला आहे. ते काल शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हा गौफ्यस्फोट केला.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे –
शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, एके दिवशी मला देवेंद्रभाऊंनी बोलवलं. जसा पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला, तसा मला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघेच जण होतो. ते म्हणाले, नाथाभाऊ तुम्हाला मी राज्यपाल करणार आहे. मी त्यांना म्हणालो, खरं सांगा. तुम्ही बऱ्याचदा हे करणार, ते करणार, पण ते काही झालं नाही. मला जरा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, नाही. तुम्हाला राज्यपाल करू. आम्ही करतोय. म्हटलं आनंदाची बातमी आहे, पण माझा विश्वास नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, हे देवेंद्रजींचे शब्द होते, हे मी जाहीर सांगत असल्याचा मोठा गौफ्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
भाजपमध्ये जाण्यासाठी दिल्लीतून फोन –
यावेळी ते म्हणाले की, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझी स्वत:हून भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. पण भारतीय जनता पक्षातील काही ज्येष्ठ लोकं आहेत, पदाधिकारी आहेत, दिल्लीत अतिउच्च पदावर जे मंत्री आहेत, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सूचना केली की, क्या करते हैं राष्ट्रवादी मे, राष्ट्रवादी खतम हो गई हैं, शरद पवार साहब का अब कुछ रहां नाही, आप भाजपमे आ जाओ, त्यानंतर मी त्यांच्या विनंती मान देऊन मला विचार करण्यासाठी संधी देण्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर आणखी एक वरिष्ठ नेत्याचा कॉल आला की, वाट का पाहत आहात. प्रवेश करुन घ्या. मग मी त्यावेळी दिल्लीत असताना जेपी नड्डाजी यांच्याकडे मी, तावडेजी (विनोद तावडे) आणि रक्षा ताई यांच्यासोबत भेटायला गेलो. भेटायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्या गळ्यात तुमचा प्रवेश होऊन जाईल, जाहीर करुन टाकू, असं त्यांनी मला सांगितलं. मात्र, त्यानंतर आज 5-6 महिने झाले, मी वाट पाहतोय. अजून तर काही जाहीर झाला नाही’, असा खुलासाही त्यांनी केला.
विनंती करणं माझ्यासाठी अपमानास्पद –
तसेच यावेळी त्यांनी असेही सांगितले की, ‘मी आता भाजपमध्ये जाणाच्या मार्गावर फुली मारली आहे. मी भाजपमध्ये येतो, असे कधीच म्हटले नाही. मला प्रवेश घ्या, असं सांगण्यात आलं म्हणून प्रवेशाच्या दृष्टिकोनातून गेलो. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन गेलो. माझ्यासारखा माणूस ज्याने 40 वर्षे भारतीय जनता पक्षाचे काम केले, इतकी वर्षे काम करुन, मेहनत करुन भारतीय जनता पक्षाला एक चांगले स्वरुप बहुजनांचे स्वरुप दिले, सर्व लोकं जोडले, अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षात मला प्रवेश द्या ही विनंती करणं माझ्या दृष्टीकोनातून फार अपमानास्पद आहे’, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.