चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. महायुतीच्या सरकारच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याचे आयोजन आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडले. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस –
देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यावेळी ते अगदी दीड दिवसाचे मुख्यमंत्री राहिले होते. अजित पवारांनी दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.
एकनाथ शिंदेंबाबत होता संभ्रम –
महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी होणार की नाही, ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही, याबाबत संभ्रम होता. पण अखेर त्यांनी पक्षांच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सर्व आमदारांनी त्यांना विनंती केली होती. त्यानुसार काल आणि आज सर्व आमदार त्यांचे मनधरणी करत होते. त्यांनी केलेली कामे, त्यांची प्रतिमा याचा फायदा पक्षाला होईल, अशी भावना शिवसेनेच्या आमदारांची असल्याने एकनाथ शिंदे हे आता राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. दरम्यान, आता त्यांना कोणते खाते मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक शपथविधी सोहळा
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दिक्षीत, रणबीर सिंग, विकी कौशल आदी मान्यवर उपस्थित होते.