शिर्डी, 19 जानेवारी : राज्यातील पालकमंत्र्यांची यादी काल रात्री जाहीर करण्यात आली असून यामध्ये मागील वेळी धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यासह बीडचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. दरम्यान, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आताची स्थिती पाहता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही अजित दादांना देण्यात यावी, अशी मी अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. आज ते शिर्डीत माध्यमांसोबत बोलत होते.
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. आज त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, मी स्वतः बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही अजित दादांना देण्यात यावी, अशी विनंती केली होती. पुण्याचा जसा विकास झाला तसा अजितदादांच्या माध्यमातून बीडचा देखील विकास होईल, अशीही त्यामागची भावना आहे. दरम्यान, माझ्यावर ज्यापद्धतीने आरोप केले जाताय त्यापैकी एक तरी आरोप खरा करून दाखवावा, असे आव्हानही धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
धनंजय मुंडे यांना धक्का –
राज्यात गाजलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच धनंजय देशमुख यांचे प्रकरणाने खळबळ उडाली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप केला जातोय. यामुळे बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि सरपंच हत्या प्रकरणाचा याचा परिणाम थेट धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदावर झालेला आहे. कालच पालकमत्र्यांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव वगळण्यात आल्याने त्यांना मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : धक्कादायक! बसने चिरडलं अन् पोलीस होण्याचं स्वप्न हिरावलं; भीषण अपघातात 3 जण जागीच ठार