ठाणे/धुळे – धुळे जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. धुळे जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंदाश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विधानसभेत अपक्ष उमेदवारी ते आता शिंदे गटात प्रवेश –
हिलाल माळी यांना विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणमध्ये उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेच्या अनेक मोठ्या आंदोलनात हिलाल माळी यांचा सहभाग होता. तसेच त्यांचे धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघांमध्ये मोठे काम आहे. तसेच हिलाल माळी यांचा धुळे शहरासह ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. आता त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांना धुळे ग्रामीणमध्ये मिळेल मोठे बळ मिळणार आहे. तर हिलाल माळी यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे ठाकरे यांच्या गटाला धुळे जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
शिव्याशाप देणाऱ्यांची तोंडे जनतेने बंद केली –
उबाठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळा ठाण्यातील आनंदाश्रम येथे पार पडला. या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि राज्य सरकारने अडीच वर्षात विकासाची कामे केली. सर्व लोक शिवसेनेत येत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने खरी शिवसेना कुणाची, बाळासाहेबांचे विचार घेऊन कोण पुढे जात आहे, लोकांनी कामाची पोचपावती दिली. अतिशय मोठे यश मिळाले. जनतेच्या न्यायालयात शिवसेना आणि धनुष्यबाण यावर शिक्कामोर्तब झाले. आम्हाला शिव्याशाप देणाऱ्यांची, विविध उपमा देणाऱ्यांची तोंडे महाराष्ट्राच्या जनतेने बंद केलेली आहेत.
विधानसभा निवडणुकीतनंतर प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्यातून लोक शिवसेनेत येत आहेत. या विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण आणि बाळासाहेब, आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आणि 3 सहयोगी आमदार निवडून आले. जनतेने खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक आयोगावर आरोप करणे, सर्वोच्च न्यायालयावर आरोप करणे यानंतर जनतेच्या न्यायालयात जाऊ. मात्र, जनतेच्या न्यायालयात जाणाऱ्यांना जनतेने कायमचे घरी बसवले आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी खासदार नरेश म्हस्के, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संख्ये यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
VIDEO – Mla Ram Bhadane : ’32 वर्षांचा तरुण पहिल्यांदाच विधानसभेत’, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणेंची मुलाखत