मुंबई, 21 जानेवारी : महाराष्ट्रात पुढील काही महिन्यातच महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडणार असताना मोठी बातमी समोर आली आहे. जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन ‘निवडणूक आयुक्त’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त –
मंत्रिपरिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. दरम्यान, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडून दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर, राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला असून दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती मिळणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी –
राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. आणि या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचे अधिक्षण, संचालन आणि नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहणार आहे. तसेच दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत.
दिनेश वाघमारे यांचा परिचय –
दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी असून ते भारतीय प्रशासकीय सेवेतील 1994 सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. तसेच त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत 29 हून अधिक वर्षांपासून सेवा दिली आहे. वाघमारे यांनी राज्य सरकारच्या विविध खात्यातील महत्वाची जबाबदारी सांभाळली असू 1996 साली पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी जबाबदारी सांभाळली. यानंतर दिनेश वाघमारे यांनी पुढे राज्यातील विविध विभागातील महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. वित्त, जमीन, उर्जा, इत्यादी विभागातील अनेक प्रकल्प त्यांच्या नेतृत्वात पूर्ण केले आहेत. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील 26 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.