पिंप्राळा (जळगाव), 18 जुलै : आषाढी एकादशीनिमित्त राज्यात सर्वीकडे उत्साहाचे वातावरण असताना जळगाव शहरातून मोठी बातमी समोर आली. पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदासुध्दा उत्साहात काढण्यात आलेल्या रथयात्रेत सुदैवाने काल बुधवारी मोठी दुर्घटना टळली. गावात नव्यानेच झालेल्या काँक्रीट रस्त्याच्या उतारावर रथावरचे नियंत्रण सुटल्याने रथ थेट एका इमारतीला जाऊन टेकला. रथाची दोन चाके रस्त्याखाली जाऊन खड्ड्यात अडकली. मात्र, रथ घराला टेकला गेल्याने मोठा अनर्थ टळला.
नेमकं काय घडलं? –
जळगाव शहरातील पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथ उत्सव हा साजरा केला जातो. या रथोत्सवाची गेले 148 वर्षांची परंपरा आहे. तसेच यावर्षीही ही परंपरा कायम राहिली आहे. मात्र, याच दरम्यान, एक मोठी घटना घडली. रथ उत्सवात रस्त्याच्या उतारावरून रथाचा वेग हा भाविकांच्या आटोक्यात न आल्यामुळे रथाचे चाक हे गटारी मध्ये गेल्याने इमारतीवर जाऊन आढळला. मात्र, सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी नाही. गटारीमध्ये अडकलेल्या रथाची चाके काढण्यासाठी भाविक भक्त अतोनात प्रयत्न करताना दिसून आले.
रथ तीन मजली इमारतीवर आदळला –
रथ चौकातून हा रथ दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी मार्गस्थ झाला. तेथून कुंभारवाड्याकडे रथ वळविण्यात येत असताना ही घटना घडली. यावर्षी झालेल्या नवीन काँक्रीट रस्त्यामुळे रथाला लावण्यात येणाऱ्या मोगरी सरकत होत्या. त्यामुळे रथ नियंत्रणात न येता मधुकर कोळी यांच्या तीन मजली इमारतीवर आदळला. या घटनेत रथाच्या उजव्या बाजूची फळी तुटली असून एका भाविकाला किरकोळ दुखापत झाली.
हेही वाचा : आषाढी एकादशी विशेष : विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमली पिंपळगाव हरेश्वर नगरी