चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 5 एप्रिल : भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत भाजपला जोरदार धक्का दिला. या प्रवेशानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाने करण पवार यांना उमेदवारी दिली. दरम्यान, माजी आमदार डॉ. सतीश पाटील हे आता करण पवार यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी? –
लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ यांच्याविरोधात ठाकरे गटाचे करण पवार निवडणुक लढवणार आहेत. यानिमित्त करण पवार यांच्या प्रचारासाठी डॉ. सतीश पाटील मदत करणार आहेत. करण पवार आणि सतीश पाटील यांच्यात काका-पुतण्याचे नाते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये राजकीय संघर्ष राहिला असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. दरम्यान हा राजकीय वाद विसरून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोघांनी एकत्र येत भाजपपुढे मोठे आव्हान उभे करणार असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. सतीश पाटील काय म्हणाले? –
करण पवार यांच्या प्रचाराबाबत डॉ. सतीश पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र महाविकास आघाडी म्हणून निवडणुक लढवण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही ठाकरे गटाला मिळाली. दरम्यान, यासाठी करण पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून याचा मला आनंद आहे.
सतीश पाटील पुढे म्हणाले की, करण पवार हे माझे पुतणेच असल्याने त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ठाकरे गटाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच आमच्या घराला आतापर्यंत अनेक पदे मिळाली आहेत. सहा वेळा आमदारकी तसेच मी स्वतः मंत्रीपद भूषविले आहे. आणि आता करण पवार यांच्यानिमित्त खासदारपदाची संधी आहे.
भाजपवर केली टीका-
करण पवार यांना मी याआधी राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य, उपनगराध्यक्ष तसेच नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले. मात्र, भाजपने त्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून त्यांच्याकडे खेचले आणि भारतीय जनता पार्टीचे कामच हे घराघरांमध्ये फूट पाडण्याचे, वितुष्ठता निर्माण करण्याचे राहिलेले आहे. दरम्यान, माझ्या मनात आता कुठलीही शंका-कुशंका राहिलेली नसल्याचे डॉ. सतीश पाटील यांनी स्पष्ठ केले.
करण पवारांना निवडून आणणे हाच एकमेव उद्देश –
सतीश पाटील पुढे म्हणाले की, झाले गेले गंगेला मिळाले आणि आता जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ही चांगली संधी मिळाली असून यामध्ये करण पवार यांना जास्त मताधिक्याने कसे निवडून आणता येईल, त्यांच्यासोबत मतदारसंघाची ताकद उभी करणे आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ निर्माण करण्यासाठी रणनिती करणे, हाच माझा एकमेव उद्देश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.