चाळीसगाव, 25 जुलै : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव महामार्ग कन्नड घाट चेक पोस्टवर सुमारे 60 कोटी रूपयांचे 39 किलो ऍफेटामाईन ड्रग्स पकडण्यात आले. दिल्लीवरून थेट बंगळुरूला ड्रग्सची तस्कारी केली जात असताना चाळीसगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत संपुर्ण प्रकरणाची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ दिली असून याप्रकरणात थेटपर्यंत कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीच्या रॅकेटचा संशय प्राथमिक तपासातून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, परराज्यात तस्करी होणारे ड्रग्स चाळीसगावात पकडल्याने पोलिसांचे देखील कौतुक आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
मंगेश चव्हाण काय म्हणाले? –
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, ड्रग्स बनविण्यासाठी वापरल्या जाणारे ऍफेटामाईन जप्त करण्यात आले असून साधरणत: 39 किलोच्या या ड्रग्सची किंमत अंदाजे 40 ते 60 कोटी रूपये इतकी आहे. पोलीस प्रशासनाने माहिती घेतल्यानंतर दिल्लीवरून बंगळुरूला या ड्रग्सची तस्करी केली जात होती. यासोबतच एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीचे रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. याठिकाणी जो ड्रायव्हरला ताब्यात घेतलाय तो फक्त त्याचा भाग आहे. खरंतर, यामागे खूप मोठं अर्थकारण असल्याचा देखील प्राथमिक तपासातून दिसत असल्याचेही मंगेश चव्हाण म्हणाले.
नार्कोटिक्स ब्युरोकडून तपासाची मागणी –
राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना ड्रग्स प्रकरणाची माहिती दिली आहे. बाहेरच्या देशातून सीमेतून हे ड्रग्स राज्यातील विविध भागात पोहचवले जात असून राज्याला तसेच देशाला बाहेरच्या शक्तीतून मोठा धोका निर्माण झाला आहे. म्हणून मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोला तपास सोपवून सखोल तपास केला जावा, अशी आमची मागणी असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले.
दरम्यान, या ड्रग्स प्रकरणात देशातील जे कोणी सहभागी असतील त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणांनी पोहचण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले. यावेळी परराज्यात जाणारे ड्रग्स चाळीसगावात पकडल्यामुळे चाळीसगाव पोलीसांचे देखील आमदार चव्हाण यांनी कौतुक केले.