धुळे, 18 ऑगस्ट : खान्देशातून दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. जळगाव येथील एका डॉक्टरांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाचा धुळ्यातील एका 24 वर्षीय सुशिक्षित तरूणीने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
धुळे शहरातील साई दर्शन कॉलनीत राहणाऱ्या नंदिनी रविंद्र खैरनार हिने टोकाचे पाऊल उचलत सावळज जवळील तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी हिचे सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण झाले होते. दरम्यान, ती नाशिक येथे पुढील शिक्षण घेत होती. दोन दिवसांपूर्वीच ती नाशिक येथून धुळे येथे घरी आली होती.
नंदिनी धुळे येथे घरी आल्यानंतर सकाळी मैत्रीणीकडे जाऊन येते असे सांगून नंदिनी घराबाहेर निघाली. मात्र, ती घरी परत परतलीच नाही. यानंतर तिचा शोध सुरु असताना ती कुठेही सापडली नाही. दरम्यान, सावळदेच्या तापी नदीच्या पुलावरून एका तरुणीने नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.स्थानिक मच्छीमारांनी संबंधित घटनेची पोलिसांना माहिती दिली.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह नंदिनी रविंद्र खैरनार हिचा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नंदिनीने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.