ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : कवयित्री बहिणाबाई चौधरी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि अभिनव बहुउद्देशीय संस्था भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शेतकरी सहायता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड याठिकाणी काल 8 मार्च रोजी या एक दिवसीय शेतकरी सहायता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आशुतोष रमेश पाटील, वक्ते कृषी सहाय्यक श्री. शिंदे आणि आवताडे सर तसेच अभिनव संस्थेचे चेअरमन डॉ. दिलीप पाटील, अध्यक्षा डॉ. सुवर्णा पाटील, मंदाकिनी पाटील आणि पोलीस पाटील निळकंठ पाटील उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना मका व गहू पिकावर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव यावर कृषी तज्ञ श्री. आवताडे यांनी मार्गदर्शन केले.
पिकांना खत पुरवठा करताना नॅनोटेक्नॉलॉजीचा त्यात सहभाग व त्याचे फायदेही यावेळी सांगण्यात आले. तसेच ड्रोन वापराने फवारणी करताना पैशांची, वेळेची व पाण्याची बचत कशी होते, यावर इफकोचे श्री. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पारंपरिक शेतीला बगल देऊन अंजीर शेती करणारे श्री. भोसले यांनीही यावेळी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अभिनव डीएमएलटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमाला श्री. नेहते, श्री. प्रांजल, चंदा पाटील, महिमा चौधरी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम पाटील यांनी तर प्रास्ताविक डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले. यानंतर आभार प्रदर्शन डॉ. दिलीप पाटील यांनी केले.
हेही वाचा – नागरिकांनो लक्ष द्या! भुसावळ विभागातील ‘या’ 3 रेल्वे स्टेशन्सवर पुढचे 7 दिवस प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद