जळगाव, 2 जून : लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर विविध सर्वेंच्या माध्यमातून Exit Poll समोर आले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रात जे फोडाफोडीचे राजकारण झाले आहे त्याचा फटका भाजपाला बसताना दिसत आहे. राज्यभरात फोडाफोडीचे राजकारण मतदारांनी अमान्य केले असल्याचे खडसे यांनी म्हटलंय.
Exit Poll वर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया –
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतला आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेला. मूळ पक्ष ज्यांचा आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले अगदी त्यांच्या हातून ते इतरांच्या हातात जाणे, हा या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे. आणि म्हणून राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नाही. त्यामुळे काही जागा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकसाठी महायुतीने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
साडेतीनशेच्या वर जागा मिळतील-
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामे केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. चारशे पार होईल, अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र, साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोलचा निकाल पाहता साडेतीनशेच्यावर जागा मिळतील, अशी चिन्हे आहेत. दरम्यान, रक्षा खडसे चांगल्या मतांनी निवडून येतील, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश कधी? –
लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपात जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, लोकसभा निवडणूकीतील प्रचार आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही त्यांचा भाजप प्रवेश झालेला नाहीये. असे असताना त्यांचा अधिकृतरित्या भाजप प्रवेश कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
हेही वाचा : सावत्र बापानेच केली 3 वर्षांच्या मुलीची हत्या, जळगाव जिल्ह्यातील हादरवणारी घटना