मुंबई, 9 डिसेंबर : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले असून विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा आज समारोप झाला. दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अभिनंदन प्रस्तावावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटाकेबाजी केली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड झाल्यानिमित्त मी त्यांचे अभिनंदन करतो. देवेंद्र म्हणाले होते की, मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले आणि त्यांचेही पुन्हा अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. दरम्यान, अध्यक्ष महोदय म्हणाले नव्हते की मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले, असेही शिंदे म्हणाले. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर तुम्ही जो निर्णय दिला त्यावर सगळ्यांनीच आरोप केलेत. मात्र, तुम्ही अतिशय संयम ठेवला आणि घाबरालात नाही. त्यामुळे कर नाही त्याला नाही डर अन् उसका नाम राहुल नार्वेकर असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
View this post on Instagram
ईव्हीएमवरून विरोधकांवर जोरदार टीका –
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लोकसभेत विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवला. लोकसभेत महायुतीला 2 कोटी 48 लाख 12 हजार 627 मते मिळाली आणि महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख इतकी मते मिळाली. महाविकास आघाडीला 31 खासदार मिळाले आणि महायुतीला 17 खासदार जिंकून आले. दरम्यान, लोकसभेत मिळालेल्या यशाच्यावेळी तुम्ही बॅलेट पेपरची का मागणी केली नाही, असा सवाल उपस्थित करत तुम्ही बुलेटवर स्वार होऊन सगळे पळायला लागले. तेव्हा नो बॅलेट, ओन्ली बुलेट असा विरोधकांना एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला.
गेल्या अडीच वर्षांत विरोधक आमच्यावर आरोप करत होते. आता ते निर्जीव ईव्हीएमवर आरोप करत आहेत. जेव्हा त्यांचा विजय होतो तेव्हा ते लोकशाहीचा विजय झाला असे विरोधक म्हणतात. निवडणूक आयोग तसेच सुप्रिम कोर्ट देखील म्हणतंय की, विरोधक जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएमवर आरोप करतात. जिंकल्यानंतर का येत नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा : ‘सतत लोकांच्या जमिनीवर ताबा सांगण्यापेक्षा….’, राज ठाकरेंचं वक्फ बोर्डाला आव्हान, काय म्हणाले?