मुंबई, 10 मार्च : पुण्यातले काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या मुंबईतील मुक्तागिरी या निवासस्थानी धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी धंगेकर यांच्यासह हा प्रवेश केलाय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
रविंद्र धगेंकर यांचा शिवसेनेत प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, रविंद्र धंगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. गेली अनेक वर्ष त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकापासून ते आमदारापर्यंतचा त्यांचा प्रवास झाला. सर्वसामान्यांच्या सुखदुखात धावून जाणारा एक कार्यकर्ता कसा असावा, याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे रविंद्र धंगेकर हे आहेत.
खरंतर, ते 10 वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यामुळे ते मूळ शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचा विचार-दिघे साहेबांचा विचार आणि महाराष्ट्रात आम्ही अडीच वर्षांत केलेले काम यावर त्यांनी प्रभावित होऊन त्यांनी स्वगृही येण्याचा निर्णय घेतला, असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना वाढीस लागणार असून पुण्यात शिवसेनेला एक ताकद मिळेल, असा विश्वासही एकनाथ शिंदे व्यक्त केला.
रविंद्र धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश –
रविंद्रे धंगेकर यांनी आज सकाळी माध्यमांसोबत बोलतना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे स्पष्ठ केले होते. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांशी बोलल्यावर लक्षात आलं की, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मला काँग्रेसचा आमदार असूनही शिक्षण मंडळाची भरतीत सहकार्य केलं. मग असं लक्षात आलं की, ज्यांचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे त्यांच्याबरोबर काम करायला काय हरकत आहे, अशी मानसिकता झाली आणि आज मी सर्वानुमते निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांबरोबर काम करावं.
दरम्यान, आज सांयकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना साथ देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. तत्पुर्वी, 2023 मध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत मुंबईत शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय.
धंगेकरांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला केली होती सुरुवात –
रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेपासून केली होती. 1997 ते 2002 मध्ये त्यांच्या भगिणी वंदना धंगेकर आणि त्यानंतर 2002 ते 2022 पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेमध्ये सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2002 साली रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अशातच आता त्यांची शिवसेनेत पुन्हा एन्ट्री झालीय.