मुंबई – राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री म्हणून शेवटची बैठक घेतली. मागील 4-5 दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आजारी होते. त्यांना घशाचा संघर्ष झाला आहे. त्यामुळे आज त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईतील ज्यूपिटर रुग्णालयात तपासणीही केली. यानंतर पुन्हा ते सक्रिय झाले.
दरम्यान, यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शेवटची बैठक घेतली. मुंबईतील दादर येथे 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून त्यात कोणतीही कमतरता जाणवू नये, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.
मागच्या आठवड्यात दिल्लीची बैठक संपवल्यावर एकनाथ शिंदे हे दोन दिवस मूळगावी दरेगावी येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी विश्रांती घेतल्यावरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दरम्यान, ते परवा रविवारी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी आले. यानंतर त्यांनी दोन दिवस आराम केला. परंतु तरीही त्यांना बरे वाटत नसल्याने आज त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन वैद्यकीय चाचण्या केल्या. तेथून ते थेट वर्षा बंगल्यावर आले. याठिकाणी त्यांनी महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून त्यात कोणतीही कमतरता जाणवू नये, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त येणाऱ्या अनुयायांना राहण्यासाठी तंबू, आरोग्य सुविधा, पुरेशी शौचालये, जेवण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे तसेच येणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश याप्रसंगी दिले. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे, त्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत, अशा सुचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
कोण कोण होतं उपस्थित –
या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.गोविंदराज, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, कोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, भदंत डॉ.राहुल बोधी, संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
eknath shinde health update : एकनाथ शिंदे आजारी की नाराज?, गुलाबराव पाटलांनी सांगितली सर्व माहिती…