मुंबई, 27 नोव्हेंबर : विधानसभा निवडणूक 2024 चा 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला निर्विवाद यश मिळाले. मात्र, गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्रीपदबाबत पेच निर्माण झाला आहे. एकीकडे शिंदेची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावे, यासाठी आग्रही तर दुसरीकडे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेत महायुतीला ऐतिहासिक यश –
विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. तसेच शिंदेंच्या शिवसेनेने 57 तर अजित दादांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 20 जागा तर काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागांवर विजय मिळवता आला आहे.
अखेर, मुख्यमंत्री पदाचा सुटणार तरी कधी?
महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्री अशापद्धतीच्या ऑफर दिल्याचे कळते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी वरील दोन्ही पर्याय नाकारल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहे. असे असतानाही भाजप देखील देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याचे समजते. दरम्यान, येत्या 48 तासात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
विरोधकांकडून महायुतीवर टीकास्त्र –
महायुतीला पुर्ण बहुमत असूनही मोदी-शहांना मुख्यमंत्री निवडता येत नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर मुख्यमंत्री पदाच्या निवडीला होणाऱ्या विलंबामुळे सुप्रिया सुळे यांनी देखील महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय.