जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पत्नी पत्नीच्या वादाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पती पत्नीच्या वादातून हत्येच्या घटनाही घडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे घडली. सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे असे आरोपी पतीचे नाव आहे. तर शीतल उर्फ आरती असे मृत पत्नीचे नाव आहे. पतीच्या डोक्यात संशयाचे वारे फिरल्याने त्याने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या केली. या घटनेत त्यांचा 10 वर्षांचा मुलगाही जखमी झाला आहे.
नेमकं काय घडलं?
सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा त्याची पत्नी शीतल उर्फ आरती हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा आणि तिला मारहाण करायचा. यातच काल गुरुवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास त्याने आपली पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यानंतर तिची आई आणि भावाने तिला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. यावेळी त्याने आपला दहा वर्षाचा मुलगा सिद्धू सोमनाथ सोनवणे याच्यावरही वार केले असून तो देखील गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच आरोपी आरोपी पती सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी मृत शीतल उर्फ आरती सोनवणे हिचा भाऊ भाऊसाहब भावलाल पवार (रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून आरोपी पती सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी दिली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Video : IPS Dr. Maheshwar Reddy : Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत, पाहा व्हिडिओ