नाशिक, 12 जुलै : गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केल्यावर आर्थिक फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. सायबर गुन्हेगार हे नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील मैत्रिणीकडून झालेल्या फसवणुकीनंतर नाशिकमध्ये एका कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या केली.
प्रशांत पाटील, असे आत्महत्या केलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. कृषी अधिकारी असलेल्या प्रशांत पाटील यांची त्यांच्या फेसबुक फ्रेंडने तब्बल 55 लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
प्रशांत पाटील हे नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरातील रहिवासी होते आणि पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना त्यांच्या फेसबुकवरील मैत्रिणीने हाफको ऑईलच्या व्यवसायाचे आमिष दाखवले होते. यामुळे प्रशांत पाटील यांनी आपले 30 तोळे सोने विकून कर्ज घेतले होते. मात्र, 55 लाख रुपयांमध्ये त्यांना त्यांच्या फेसबुक मैत्रिणीने गंडा घातला आणि शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
नेमकं काय घडलं –
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील यांच्या फेसबुक आयडीवरुन त्यांना पद्मा चित्ते असं नाव असलेल्या फेसबुक अकाऊंटवरुन फ्रेंड रिक्वेस्ट आली. हे पद्मा चिट्टे यांना ओळखत नसताना त्यांनी ती फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यानंतर त्या महिलेने आपण मी आयुर्वेदामध्येच काम करते आहे आणि हापको ऑईलचा व्यवसाय करूया. तुम्ही हे ऑईल खरेदी करा आणि आम्ही ते ऑईल परदेशामध्ये पाठवू. आमचा व्यक्ती येईल आणि तुमच्याकडून ते ऑईल घेईल आणि परदेशामध्ये पाठवून देईल. तुम्ही फक्त ते खरेदी करा.
या महिलेच्या सांगण्यावरुन प्रशांत पाटील यांनी त्या महिलेवर विश्वास ठेवला. सुरुवातीला त्याने 1 लाख 59 हजाराचे ऑईल खरेदी केले. यानंतर समोरुन सांगण्यात आलं की, इतक्या लहानशा ऑर्डरसाठी माणूस पाठवता येणार नाही. तुम्ही मोठी ऑर्डर घ्या. ते म्हणाले, की मोठ्या ऑर्डरसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मग समोरुन त्यांना सांगण्यात आलं की, आम्ही तुम्हाला एक कुरिअर पाठवतो. त्यामध्ये विदेशी चलन असेल. ती तुम्ही तुमच्या भारतीय चलनात करुन घ्या आणि मग ते ऑईल खरेदी करा.
मग विदेशी चलनात पाठवण्याचा खर्च किती येईल आणि विदेशी चलन फॉरेन्सिक सायन्सच्या तपासणीला पाठवल्यावर त्याचा खर्च किती येईल, अशी वेगवेगळी कारणे देत त्यांनी प्रशांत पाटील यांच्याकडून पैसे घेत गेले. डिसेंबर 2023 पासून ते पैसे देत होते आणि मागच्या दोन महिन्यापर्यंत पैसे देत राहिले. है पैसे देण्यासाठी प्रशांत पाटील यांनी त्यांच्या पत्नीचे 30-35 तोळे सोने गहाण ठेवले. त्यानंतर ठाणे जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज काढले. मित्रांकडूनही अनेक रुपयांचे कर्ज घेतले. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर कर्ज झाले आणि मग ही कर्जाची रक्कम कशी परत करावी, अशी चिंता त्यांना वाटू लागली. यासाठी त्यांनी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
यानंतर सायबर पोलिसांनी पोर्टलवर त्यांची तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करणार होते, या दरम्यान, ते अत्यंत तणावात आले आणि या तणावातूनच त्यांनी 6 जून 2025 रोजी घरी कुणीही नसताना विषारी औषध घेतले. यावेळी त्यांची पत्नी माहेरी होती. तिला फोन करुन, तब्येत खराब असल्याचे कुणीतरी सांगितले. यानंतर ती लवकर धावत पळत आली. प्रशांत पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र, ते वाचू शकले नाही. त्यांचा मृत्यू झाला. खोट्या आश्वासनामुळे, 55 लाख रुपये गमावल्यामुळे तणावात येऊन त्यांनी ही आत्महत्या केली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांना रिक्वेस्ट आली, ज्यावर चॅटिंग झाली तो मोबाईल नंबर याचा आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली. दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.