चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 11 जून : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे अंडरपास बोगद्यामध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आसोदा गावात घडली. सुकलाल लालचंद माळी (वय ६३ रा. आसोदा ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर असोदा गावच्या ग्रामस्थांनी परिवारास नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी रेल्वे बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्यात आसोदा गावाच्या लगत रेल्वे महामार्ग असून या रेल्वे मार्गावरून ग्रामस्थांनी रुळ ओलांडून जाऊ नये, यासाठी रेल्वेकडून अंडरपास बोगदा करण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री या भागात जोरदार पाऊस झाल्याने या बोगद्यात मोठ्या प्रमाणात गाळ आणि पाणी साचले होते. परिणामी आसोदा गावातील शेतकरी सुकलाल माळी हे सकाळच्या सुमारास या बोगद्यातून बैलगाडी घेऊन जात असताना त्यांचे बैल चिखलात फसले.
चिखलात फसून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू –
दरम्यान, त्यांनी बैलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता सुकलाल माळी हे देखील त्या चिखलात फसून मरण पावल्याचे दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच संपूर्ण ग्रामस्थांनी रेल्वे अंडरपास बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाने या घटनेची जबाबदारी घेऊन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत किंवा सरकारी नोकरी द्यावी, अशी यावेळी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. याबाबत रेल्वेचे अधिकारी सध्या ग्रामस्थांसोबत चर्चा करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.
शेतकऱ्याच्या निधनाने कुटुंबियांचा आक्रोश –
सुकलाल माळी हे बुडाल्याची माहिती मिळताच शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांनी त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यची नोंद करण्याचे काम सुरू होते
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पंधराच दिवसात घडली दुसरी घटना, इंजिनिअरने ट्रेडिंगच्या नादात गमावले 27 लाख रुपये