नंदुरबार, 14 ऑगस्ट : उद्या (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त लाल किल्ल्यावर दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील अनेकांना निमंत्रित केले जाते. यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेच्या 24 लाभार्थ्यांना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारंभाला बोलावण्यात आले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकडदा येथील लालसिंग वन्या वळवी यांची निवड करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान –
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकडदा येथील शेतकऱ्यांनी भारत सरकारच्या सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत ‘आमु आखा एक से शेतकरी उत्पादक कंपनी’ स्थापन करून प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या कंपनीचे संस्थापक लालसिंग वन्या वळवी यांना स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे.
कार्याची घेतली दखल –
नंदुरबार जिल्ह्यात नाबार्डच्या अर्थसाहाय्याने व नाबार्डची सहायक संस्था डीएससी (डेव्हलपेंट सपोर्ट सेंटर) च्या मार्गदर्शनात पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. काकडदा येथे लालसिंग वन्या वळवी व आशा लालसिंग वळवी यांच्या या कंपनीची दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली. परिसरातील 17 गावांतील सुमारे 589 शेतकरी यात सहभागी आहेत. विशेष म्हणजे यात, 72 महिला शेतकरी आहेत. या कंपनीत सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अल्पभूधारक आदिवासी शेतकरी आहेत. शेतकरी गटाच्या माध्यमातून खत विक्री, धान्य व आमचूर खरेदीचाही व्यवसाय करू लागले आहेत.