ईसा तडवी, पाचोरा
पाचोरा, 10 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यात झालेल्या शेतकरी अनुदान घोटाळ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता याप्रकरणी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर निशाणा साधत मोठी मागणी केली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून आमदारांची या प्रकरणावर चुप्पी का आहे, असेही दिलीपभाऊ वाघ यावेळी म्हणाले. पाचोरा येथे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले माजी आमदार दिलीपभाऊ वाघ –
माध्यमांशी बोलताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ म्हणाले की, मागच्या काळातही शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांच्या अनुदानाची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न काही एंजट, दलाल विशिष्ट लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. मागच्या काळात इतका मोठा अनुदान घोटाळा होऊनही आमदार गप्प कसे बसले आहेत. शासनाने इतकी मोठी मदत या मतदारसंघात दिली. आज पाचोरा तालुक्यात प्रथमदर्शनी अनुदान घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, याची व्याप्ती वाढत चालली असून जवळपास 8 ते 10 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. यामध्ये कोण अधिकारी आहेत, कोण एजंट आहेत, की आमदारांचे एजंटची काही हितंसंबंध आहेत, असे म्हणत आमदारांची यावर चुप्पी का असा सवाल माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना केला. तसेच आमदारांची या अनुदान घोटाळ्यावर चुप्पी का, असा सवालही दिलीपभाऊ वाघ यांनी केला.
शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी प्रशासनाची असते. त्याच प्रशासनातील काही लोकांना हाताशी धरुन काही एजंट लोकांनी हा पैसा हडप केलेला आहे. याची व्याप्ती आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे एका वेगळ्या यंत्रणेमार्फत तसेच एसआयटीमार्फत याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना शासन झाले पाहिजे, अशी मागणी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी केली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या पत्रकार परिषदेत भाजप नेते मधू काटे, वैशालीताई सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पाचोऱ्यात महायुतीमधील संघर्ष चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीतून नव्हे तर स्वबळावर देखील होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने निवडणुकी आधीच पाचोऱ्यातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे.