जळगाव, 14 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आणि सामाजिक न्याय सप्ताहाच्या निमित्ताने “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना” अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे होते. प्रमुख उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, प्रा. बी. एन. चौधरी (प्राचार्य, धरणगाव महाविद्यालय), व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभागाचे श्री. योगेश पाटील यांचा समावेश होता.
शेतकरी मेळाव्याचे आयोजन –
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर प्रा. बी. एन. चौधरी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रामीण समाज व शेतकऱ्यांसाठी योगदान” या विषयावर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सुधारणांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेत उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणे, सामाजिक समतेला बळ देणे आणि वंचित घटकांना शासनाच्या योजनांचे लाभ मिळवून देणे, असा हेतू स्पष्ट करण्यात आला.
समारंभात समाजकल्याण विभागामार्फत विविध योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आला. मयत ऊसतोड कामगाराच्या वारस श्रीमती गिताबाई श्रावण राठोड यांना 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच परराज्य शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कुमारी कोमल भरत चिमकर हिला शिष्यवृत्तीचा धनादेश देण्यात आला. स्वाधार योजनेचे 5 लाभार्थी, कन्यादान योजनेचे 2 पात्र लाभार्थी व 3 संस्थांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी मान्यवरांचे अभिनंदन करत केले.