एरंडोल (जि. जळगाव) : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, त्यातच आता आणखी एक हादरवणारी घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथून समोर आली आहे. मुलाचा खून करुन बापानेही आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरुन या घटनेचा खुलासा झाला.
काय आहे संपूर्ण घटना –
मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने आपल्या मुलाचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. ही घटना एरंडोल येथे काल (गुरुवारी) उघडकीस आली. बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवर त्यांनी मुलाचा खून करून तो पुरल्याची माहिती दिली. विठ्ठल पाटील (५०) आणि हितेश पाटील (२२) अशी या मृत बाप-बेट्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा (ता. एरंडोल) येथील मूळ रहिवासी होते. ते आपल्या परिवारासह एरंडोल येथील वृंदावन नगरात वास्तव्यास होते. तर त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील हा सोशल मीडियावर रिल्स बनवायचा. मात्र, तो वडिलांपासून वेगळा राहत होता. तसेच तो वडिलांचा छळ करून मारहाण करत होता. या संपूर्ण प्रकाराला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून केला आणि त्यानंतर स्वतः ही आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये काय?
दरम्यान, विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यास कंटाळून भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ त्याचा खून केला व मृतदेह जमिनीत पुरला आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळले.
काल गुरुवारी हितेश पाटील याचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळून आला. यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी सुती दोरी आढळून आल्याने या दोरीनेच विठ्ठल पाटील यांनी मुलाला फाशी दिली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा – Jalgaon DM Ayush Prasad : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने रचला नवा विक्रम, महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक!