जळगाव : बाप आणि मुलीचे नाते हे खूपच घट्ट असते. एका बापासाठी त्याची मुलगी ही सर्वस्व असते आणि बाप आणि मुलीच्या प्रेमळ नात्यासंदर्भात एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:ची किडनी दिली.
बाबूराव कोळी असे या बापाचे नाव आहे. बाबूराव कोळी हे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून जवळच असलेल्या मांगलवाडी येथील रहिवासी आहे. तसेच 59 वर्षीय बाबूराव कोळी हे शेतमजुरी करतात. त्यांनी आपल्या 29 वर्षांच्या मुलीचे रूपाली योगेश कोळी (साळुंखे), (रा. चिंचोली, ता. यावल) हिचे प्राण वाचवण्यासाठी आपली किडनी दान करत तिला जीवदान दिले. मुलीचे प्राण वाचवण्यासाठी आपली स्वत:ची किडनी दान करणाऱ्या या बापाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं होतं –
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाबूराव कोळी यांची मुलगी रूपाली योगेश कोळी हिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यामुळे मागील अडीच वर्षांपासून ती डायलिसिसवर होती. रुपालीला एक ६ वर्षांची मुलगी आहे. तसेच मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. हार्दिक शाह यांच्याकडे रुपालीवर उपचार आणि डायलिसिस सुरू होते. मुलीची ही अवस्था पाहताना, तिच्या वेदना पाहताना आई-वडील अवस्थ होत होते. त्यामुळेच रुपालीचे वडील बाबूराव कोळी यांनी आपल्या मुलीला किडनी देण्याचा संकल्प केला.
यानंतर त्यांनी आपल्या मुलीसाठी स्वत:ची किडनी दान केली. एका बापाच्या दातृत्वामुळे त्याच्या मुलीचा पुनर्जन्म झाला. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मुलीचे प्राण वाचवण्यासाठी आपली स्वत:ची किडनी दान करणाऱ्या या बापाचे सर्वत्र कौतुक होत आहे.