अमृतसर – पंजाब राज्यातील शिरोमणी अकाली दल (SAD) पक्षाचे नेता आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या गेटवर एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्लात ते थोडक्यात बचावले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली. गोळीबार केलेल्या व्यक्तीचे नाव नारायण सिंह चौरा असे सांगितले जात आहे. त्याला स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्या जवळचे पिस्तूलही ताब्यात घेण्यात आले आहे.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल हे मंगळवारपासून अमृतसरच्या सुवर्ण मंदिर अर्थात श्री हरमंदिर साहिब गुरुद्वाराबाहेर पहारा ठेवून शिक्षा भोगत आहेत. मंगळवारी दुपारी ते व्हीलचेअरवर बसून गुरुद्वारात पोहोचले. त्यांच्या गळ्यात दोषी असल्याची पाटीही होती. शिक्षेच्या पहिल्या दिवशी त्यांनी सुवर्ण मंदिराच्या सामुदायिक स्वयंपाकघरातील भांडीही धुतली. यावेळी त्यांनी सैनिकांचा पोशाख परिधान केला होता. तसेच रक्षकासाठी हातात भाला. सुखबीर सिंह बादल यांच्या पायात फ्रॅक्चर असल्याने त्याला प्लास्टर लावले आहे आणि ते व्हीलचेअरवर पहारेदारी करत आहेत. या दरम्यान, त्यांच्यावर आज सकाळी गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला.
सुखबीर सिंह बादल यांना शिक्षा का सुनावण्यात आली –
शीख समुदायाच्या ‘सर्वोच्च न्यायालयाने’ म्हणजेच श्री अकाल तख्त साहिबने सुखबीर बादल यांना शिक्षा सुनावली आहे. ते गुरुद्वारामध्ये सेवा करत भांडी धुणार आणि पहाराही देणार आहेत. तसेच श्री दरबार साहिबमध्ये बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांचीही स्वच्छता करणार आहे. 2007 ते 2017 या काळात अकाली दल सरकारच्या काळात झालेल्या धार्मिक चुकांसाठी जथेदार श्री अकाल तख्त यांनी बादल आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना शिक्षा सुनावली आहे. त्याच शिक्षेची भरपाई अकाली नेते सेवा देऊन करत आहेत.
काय आहे आरोप –
अकाल तख्तने सुखबीर सिंह बादल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध दोषी ठरवले. बादल यांनी डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला ईशनिंदा प्रकरणात माफी मिळण्यास मदत केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच यासाठी बादल यांनी आपला प्रभाव वापरून राम रहीमविरोधातील तक्रार मागे घेतली. श्री गुरू ग्रंथ साहिबच्या अपमानप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही आणि संगतांच्या पैशातून राजकीय जाहिराती केल्या गेल्या. डीजीपी सुमेध सैनी यांची नियुक्ती हा धार्मिक गुन्हा असल्याचे म्हटले आहे.
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?, आज नाव होणार जाहीर, असा असेल आजचा घटनाक्रम