चाळीसगाव, 20 ऑगस्ट : चाळीसगाव शहरात प्रथमच 23 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी 5 वाजता प्रकाशझोतात पहिल्या आमदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धचे विभागीय व तालुकास्तरावर आयोजन केले आहे. यासाठी शुक्रवार अखेर विभागीय स्तरावर 175 तर तालुकास्तरावर 42 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.
चाळीसगावात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी आमदार मंगेश चव्हाण हे सहकार्य करीत आहेत, अशी माहिती उत्तर विभागीय बॉडीबिल्डिंग अॅण्ड फिजिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष मोहन चव्हाण यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
असे असेल स्पर्धेचे आयोजन –
या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 25 बाय 60 फूट उंचीचा राष्ट्रीयस्तरीय रंगमंच उभारण्यात येत आहे. तसेच स्पर्धेसाठी 0 ते 55, 56 ते 60, 61 ते 65, 66 ते 70 व 70 किलोंवरील वजनी गटातील स्पर्धक पात्र असतील. दरम्यान, चाळीसगावात येणाऱ्या 200 खेळाडू व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यंत प्रगतीकारक स्पर्धकास 5001 रूपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
यासाठी स्पर्धेचे आयोजन –
स्थानिक खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी प्रथमच तालुकास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी प्रत्येक वजनी गटात प्रथम ते उत्तेजनार्थ अशी पाच बक्षिसे देण्यात येतील.