नवी दिल्ली, 24 एप्रिल : काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यावेळी 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना केंद्र सरकार देखील अॅक्शनमोडमध्ये आलंय. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील दौरा अर्धवट सोडला आणि नवी दिल्लीत ते पोहचले.
यानंतर पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तसेच सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपुर्ण माहिती घेतली. यानंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीत सुरक्षाविषयक कॅबीनेट समितीच्या बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले. यानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव यांनी विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्यानंतर घेतलेल्या पाच निर्णयांची माहिती दिली.
केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय खालीलप्रमाणे –
1. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी त्यांना 48 तासांची मुदत आहे.
2. संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली आहे. दरम्यान, ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, त्यांना ते 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे.
3. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 मध्ये सिंधू पाणी करार करण्यात आला होता. आता हा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आलाय. दरम्यान, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील, असे सांगण्यात आले आहे.
4. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, हवाई, लष्करी, आणि नौदल अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा, असे आदेश देण्यात आले आहे.
5. तसेच भारताने देखील इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतलाय.
हेही पाहा : ओळख प्रशासनाची : ग्रामपंचायत विभागाचं कामकाज कसं चालतं?, Dy. CEO भाऊसाहेब अकलाडे यांची विशेष मुलाखत
भारताचा पाकिस्तानवर ‘कायेदशीर स्ट्राईक’ –
दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जातेय. तर दुसरीकडे केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखत पाकिस्तानवर ‘कायेदशीर स्ट्राईक’ केल्याचे बोलले जात आहे.