एरंडोल (जळगाव), 20 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील गट क्रमांक 21 मधील शेतात आज 20 ऑगस्ट दुपारी झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बंडू युवराज पाटील व अलकाबाई बंडू पाटील यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण लावण्यात आले होते. या कुंपणाला विजप्रवाह सोडण्यात आलेला होता. संबंधित इसमांचा त्या तारेला स्पर्श झाल्यामुळे ही घटना घडली.
विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू –
वरखेडी येथील या या दुर्घटनेत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विकास रामलाल पावरा (30), सुमन विकास पावरा (25), पवन विकास पावरा (4), कवल विकास पावरा (3) व लिलाबाई जामसिंग पावरा (60) यांचा समावेश आहे. तसेच दुर्गा विकास पावरा (2) ही मुलगी सुखरूप बचावली आहे.
मयत मध्यप्रदेशातील रहिवासी –
मृतदेह जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृतक हे मध्यप्रदेशातील जि. बुरहानपूर, ता. खकणा येथील पो. ओसरणी गावचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाकडून या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले? –
एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्याने वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये पावसाचे वातावरण असताना शेतातील काम करणाऱ्या लोकांनी लाईन टू ग्राऊंड सारखं शॉर्ट सर्किट झालेले आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या 5 जणांना जागेवर शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये 1 लहान मुलगी अनाथ झालेली आहे. तिला बाल कल्याण समितीकडे देण्यात आलेले आहे. या घटनेतील मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहे.
View this post on Instagram
या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच तहसिलदार, अधीक्षक अभियंता यांनी भेट दिली आहे. पावसाचे वातावरण असल्याने लाईन टू ग्राऊंड फॉल्ट झाला. यामध्ये या 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
एसपी डॉ. महेश्वर रेड्डी काय म्हणाले?-
घटनेबाबत बोलताना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी प्राप्त झाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर यावेळी काही विजेच्या तारा आढळून आल्या. पोलिसांनी संबंधित घटनेची पुढील माहिती घेतली असता शेतीमालकाला ताब्यात घेण्यात आले.
View this post on Instagram
दरम्यान, शेतजमिनीत पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण लावले आणि त्यामध्ये काल रात्री त्या तारांमध्ये वीज प्रवाह सोडल्याची माहिती पोलिस तपासातून प्राप्त झाली. यामुळे या विजेच्या तारांना धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेतमालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलीय.