जळगाव : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वातावरण तापलेले असताना जळगाव जिल्ह्यातून आता आणखी एक धक्कादायक घटना घडली. जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची हत्या घडल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
जळगाव तालुक्यातील कानसवाडे परिसरात ही घटना घडली. युवराज सोपान कोळी (वय-35) असे हत्या झालेल्या माजी उपसंरपचाचे नाव आहे. युवराज कोळी हे कानसवाडे येथे शिंदे गटाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते.आई-वडील, पत्नी आणि मुलांसह ते वास्तव्यास होते. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे.
दरम्यान, गुरूवारी रात्री गावातील काही जणांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याच वादातून शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्यावर तिघांकडून धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. यावेळी युवराज कोळी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना पाहताच आजुबाजुचे ग्रामस्थ धावत आले. मात्र, तोपर्यंत हल्लेखार घटनास्थळावरून पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ए. सी. मनोरे यांनी तातडीने भेट दिली. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जळगावचे एसपी काय म्हणाले?
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी म्हणाले की, आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास कानसवाडी रस्त्यावर एका शेतात युवराज सोपान कोळी (वय 35) यांचा खून झाला. भरत पाटील, देवा पाटील, महेश पाटील अशी खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तीन आरोपींना युवराज कोळी यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केली. त्यापैकी भरत पाटील याला अटक झाली आहे.
खुनामागचं कारण काय?
याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी म्हणाले की, आरोपीचा FL 3 चा परवाना आहे. त्याचा एक ढाबा आहे. त्याठिकाणी 31 डिसेंबर रोजी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर कालही काहीतरी वाद झाला होता. या कारणावरुन त्यांचा आज सकाळी खून करण्यात आला, असे तपासात निष्पन्न झालेले आहे. यामागे आणखी काय कारण आहे, याबाबत तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.