नाशिक, 9 जून : सामाजिक प्रगतीकरीता कृतज्ञता, वेळेचे नियोजन आणि मानव संसाधन व्यवस्थापन या त्रिसुत्रीचा अवलंब सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी केले. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध उपक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा समारंभ किरण बेदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर (निवृत्त, लेफ्टनन्ट जनरल) अध्यक्षस्थानी होत्या.
तर समवेत सायना भरुचा, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी किरण बेदी यांनी सांगितले की, कामावर श्रध्दा ठेऊन केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवाण्यास मिळतो. तरुणांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करुन काम केल्यास त्याचा आनंद खूप सुखावह असतो. विद्यार्थी दशेत असतांना सर्वांनी कृतज्ञता, वेळेचे नियोजन आणि मानव संसाधनाचा योग्य पध्दतीने व्यवस्थापन यांचा अवलंब करावा. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यासाठी सकारात्मक प्रयत्न गरजेचे असतात. सामाजिक दायित्व व नैतिक जबाबदारी आदींचे भान असणे आवश्यक आहे.
आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाला मोठया प्रमाणात संधी आहेत. यासोबत पेटंट पध्दती करीता देखील विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील रहावे. आपला समाजात वावर, विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन, क्रीडा यातून सकारात्मक विचारांची निर्मिती होते. विद्यापीठाने सांस्कृतिक, संशोधन व क्रीडा विषयक कार्यक्रमातून आपणांस व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. शुध्द मनाने व विचारांनी सतत सकारात्मकतेने काम करत राहिल्यास आपण नक्कीच यशाचे भागीदार होणार, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व कौशल्य वाढीकरीता विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांचा मोठया प्रमाणात सहभाग व उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आरोग्य शिक्षणाबरोबर सर्वांगिण विकासासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. स्पंदन-2023 मध्ये विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण अत्यंत स्त्युत्य आहे, पारितोषिक विजेते सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांनी अधिकाधिक यशाची शिखरे पादाक्रांत करावीत आणि विद्यापीठाचा नावलौकिक करावा असे त्यांनी सांगितले.
किरण बेदी यांच्या कन्या काय म्हणाल्या –
याप्रसंगी सायना भरुचा यांनी सांगितले की, आपले सकारात्मक कार्य महत्वपूर्ण असून त्यानुसार चरित्र घडत असते. यासाठी सर्वांनी चांगले कार्य करा तरच सन्मान होईल. माझी आई श्रीमती किरण बेदी यांच्याकडून काम करण्यासाठी नेहमीच पॉझिटिव्ह उर्जा मिळत असते. प्रामाणिकपणाने काम केल्यास यश आपोआप मिळते. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाकडून करण्यात आलेला सन्मान अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
किरण बेदी यांचा वाढदिवस साजरा
दरम्यान, आज किरण बेदी यांचा आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रम उपरांत केक कापण्यात आला. समवेत सभागृहातील सर्व विद्यार्थ्यांनी एकसुराने जन्मदिन शुभेच्छांचे गीत गाऊन शुभेच्छा दिल्या. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी किरण बेदी यांना वाढदिवासाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
तर याप्रसंगी विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु व कुलसचिव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोग सन 2023 परीक्षेत विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालातील राज्यातील टॉप विद्यार्थी, स्पंदन – 2023 मध्ये विविध कला प्रकारात पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट एकक, आखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य पदक प्राप्त विद्यार्थी, प्रजासत्ताक दिनी मुंबई येथे पथसंचलनात सहभागी विद्यार्थी, राष्ट्रीय एकता शिबीरात सहभागी विद्यार्थी, उत्कर्ष या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून पारितोषिक प्राप्त विद्यार्थी, नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टीवल – 2023 करीता निवड झालेले विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यासोबतच आरोग्य विद्यापीठातर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शाखानिहाय विशेष शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थींना विद्यापीठातर्फे बक्षीस रक्कम रक्कम रुपये पंचवीस हजार व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पंदन सांस्कृतिक महोत्सव, आविष्कार संशोधन महोत्सव, इंद्रधनुष्य राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृहात आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे विद्यापीठातर्फे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास निवृत्त लेफ्टनन्ट जनरल श्री. राजीव कानिटकर, एम.पी.जी.आय.चे अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा, डॉ. मृणाल पाटील, विद्यापीठाचे प्राधिकरण मंडळाचे सदस्य, विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.