भडगाव – जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पारोळा पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग महादू पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे.
पांडुरंग महादू पाटील (63, टिटवी, ता. पारोळा, ह.मु, भडगाव) हे जळगाव येथे कामानिमित्त जात असताना शिरसोली ते जळगावदरम्यान त्यांचा अपघात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. यानंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान, काल शनिवारी त्यांचे निधन झाले.
पांडुरंग महादू पाटील हे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच पारोळा पंचायत समितीचे माजी सभापती होते. त्यांच्या पश्चात भाऊ-बहीण, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या वाढत्या घटना –
जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. फक्त जळगाव शहरात मागील आठवड्यात तब्बल 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. जळगावातील वाढलेल्या अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असताना दिसत आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नागरिकांना आवाहन –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाढत्या अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, जास्त अपघाताच्या घटना दुचाकी वाहनांच्या असतात. म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की, सर्वांनी कुठल्याही परिस्थितीत दुचाकीवरून ट्रीपल शीट प्रवास करू नये. आपण सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा. अपघातांच्या घटना ज्याठिकाणी घडतात. त्याठिकाणी सावधपणे वाहन चालवणे गरजेचे आहे. वेगमर्यादा लक्षात घेऊन वाहन चालवले पाहिजे.
दरम्यान, रस्ते अपघातांच्या घटना कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यामध्ये रस्त्यांवर स्ट्रीट लाईट, ट्रॅफिक लाईट लावणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि गतिरोधक बसविणे यांसारख्या कामांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले.