ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 3 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात भारतीय जनता पक्षाच्यावतीने 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आमदार तथा भाजप नेते दिलीप वाघ यांनी दिली. पाचोरा शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आज 3 नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, या मेळाव्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप वाघ यांनी केले आहे.
भाजपच्यावतीने मेळाव्याचे आयोजन –
पत्रकार परिषदेत माहिती देताना दिलीप वाघ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरपालिका तसेच नगरपंचायत पहिल्या टप्प्यात, जिल्हा परिषद दुसऱ्या टप्प्यात तर महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या तिसऱ्या टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुर्वतयारी म्हणून पाचोरा शहरातील सारोळा रोड येथील समर्थ लॉन्स येथे 5 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाचोरा शहर तसेच तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्रपणे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आमदार किशोर आप्पा पाटीला यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित निर्धार मेळाव्यात दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशाली सुर्यवंशी तसेच प्रताप पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या टीकेला भाजपने आयोजित केलेल्या मेळाव्यातून प्रत्युत्तर दिले जाईल, असेही माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले.
भाजपने आयोजित केलेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे अमोल शिंदे, वैशाली सुर्यवंशी, प्रताप पाटील, प्रदीप पाटील, बन्सी पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.






