चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 2 सप्टेंबर : “एकीकडे राज्य सरकारकने लाडकी बहिण योजना आणली असताना दूध संघात लाडका साडू योजना सुरू आहे. तसेच दूध संघाचा कारभार चेअरमन यांचे साडू बघत असून त्याठिकाणी काळाबाजार सुरू आहे”, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आज केला. जळगावातील पद्मालय रेस्ट हाऊस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 5 सप्टेंंबर रोजी आयोजित केली आहे. दरम्यान, या सभेआधीच महाविकास आघाडीतील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना किमान 2 रूपये बोनस द्यावा –
माजी खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की, ज्यावेळेपासून यांच्या नेतृत्त्वात दूध संघात यांचं सरकार बसलं त्यामुळे आतापर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही. दूध संघ स्थापन झाल्यापासून ते करोना काळात बोनस देऊ शकतात. म्हणून आता किमान 2 रूपये बोनस द्यावा, अशी मागणी यामुळे मागचा देखील अनुशेष भरून निघेल आणि यामाध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, ज्यांचा दूधाचा आणि जमिनीचा संबंध नाहीये, ज्यांना दूधाचं ज्ञान नाही, ज्यांच्याकडे म्हैस-गाय नाही त्यांना दूध संघाच्या चेअरमन पदावर बसवलं, अशी टीका त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर केली. तसेच दूधात भेसळ होत असून जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर आम्ही ती भेसळ जिल्ह्यासमोर आणू, असेही ते म्हणाले.
उन्मेश पाटील यांचे मंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान –
माजी खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. उन्मेश पाटील यांनी गुलाबराव पाटील यांची दूध संघाबाबतची एक व्हिडिओ प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत ऐकवली. केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जिल्हा दूध संघासाठी मदत आणू. आणि वर्षभराच्या आत जर दूध संघात फरक पडला नाही. तर पहिला राजीनामा माझा असेल, असे मंत्री गुलाबराव पाटील त्या व्हिडिओत म्हणाले होते. दरम्यान, यावरून जर शेतकऱ्यांविषयीची त्यांच्यात जाणीव असेल तर त्यांनी दूध संघाच्या वार्षिक बैठकीत राजीनामा द्यावा, असे आव्हान उन्मेश पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना यावेळी दिले.
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका –
महिला सक्षमीकरणाच्या मुद्यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. महिला सक्षमीकरणासाठी प्रति संस्था 20 लाख रूपये इतके कर्ज देऊ, असा शब्द मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. मात्र, केंद्रात आणि राज्यात तसेच दूध संघात त्यांचे सरकार असताना दूध संघाच्या माध्यमातून एका संस्थेला देखील अर्थसहाय केले नसल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केला.
यांची होती उपस्थिती –
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, शिवसेना उबाठाचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, काँग्रेसचे महानगर प्रमुख शामकांत तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्यासह महाविकास आघाडी, समविचारी पक्ष नेते, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत