जळगाव, 29 डिसेंबर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जळगाव तालुक्यातील किनोद येथे जलसंधारण व ग्रामविकासाला चालना देणाऱ्या विविध कामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जलतारा शोषखड्ड्यांचे भूमिपूजन प्रत्यक्ष कुदळ मारून करण्यात आले. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवन व अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन फीत कापून संपन्न झाले.
या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाने यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची उद्दिष्टे व त्याचे महत्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. पाणी साठवण, स्वच्छता, आरोग्य, क्रीडा व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे अभियान उपयुक्त असून ग्रामस्थांनी एकजुटीने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असून विकासकामांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.






