जळगाव, 19 सप्टेंबर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईत रेल्वेत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांचा रोख रक्कम असलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय? –
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना 18 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जी.एस. ग्राऊंड परिसरात काही संशयास्पद इसम आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने संशयितांचा शोध घेतला असता, विना क्रमांकाची मोटारसायकल व त्यावरील पिशवीत रोख रक्कम आढळली. पोलिसांना पाहताच हे इसम पळ काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पथकाने पाठलाग करून त्यांना जागीच पकडले.
संशियातांच्या ताब्यात असलेली विना नंबरच्या मोटार सायकलला लावलेल्या पिशवी पाहिली असता त्यात रोख रक्कम असल्याची दिसली. त्याबाबत त्यांना विचारपुस करता ते उडवाउडवीचे उत्तर देवु लागल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कार्यालयात आणण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांच्या नाव तसेच गावाबाबत माहिती दिली. 1) किरण पंडीत हिवरे वय 32 रा. भातखेडा ता. रावेर, 2) अजय सुपडू कोचुरे वय 25 रा. खिर्डी ता. रावेर, 3) हरिष अनिल रायपुरे वय 25 रा. प्रतापपुरा बऱ्हाणपुर (म.प्र.), 4) गोकुळ श्रावण भालेराव वय 27 रा.डांभुर्णी ता. यावल यांचा त्यामध्ये समावेश आहे.
View this post on Instagram
दरम्यान, यातील हरिष रायपुरे याने कबुली दिली की, दि. 9 सप्टेंबर रोजी त्यांनी संगनमताने कामायनी एक्सप्रेसमध्ये रावेर रेल्वे स्थानकावर प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (वय 60, रा. बुरहानपूर, म.प्र.) यांना मारहाण करून त्यांच्या जवळील पैशांची बॅग हिसकावली होती. त्याच पैशांचे वाटप करण्यासाठी ते जळगावात जमा झाले होते.
साडेचार लाखांचा रोख रक्कम असलेला मुद्देमाल जप्त –
यानंतर एलसीबीने त्यांच्या ताब्यातून रोख 4 लाख 50 हजार रुपये तसेच विना क्रमांकाची मोटारसायकल असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई करून आरोपींना आणि जप्त मुद्देमालासह लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी संदीप उर्फ आप्पा शामराव कोळी (रा. डांभुर्णी, ता. यावल) हा फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
या पथकाने केली कारवाई –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम, पोशि गौरव पाटील आणि मिलिंद जाधव आदींनी ही कारवाई केली.