मुंबई, 30 डिसेंबर : भांडुप (पश्चिम) परिसरात सोमवारी 29 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास बेस्ट बसच्या अपघाताची धक्कादायक घटना घडली. भांडुपच्या स्टेशन रोड परिसरात BEST च्या भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना धडक दिल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त करित मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भांडुप पश्चिम स्टेशन रोड या गजबजलेल्या परिसरात आकाराने मोठी असलेली इलेक्ट्रिक BEST बस मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटला. यावेळी बसने रस्त्यावर असलेल्या 13 नागरिकांना चिरडले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. वर्षा सावंत (25 वर्षे), मानसी मेघश्याम गुरव (49 वर्षे), प्रशांत शिंदे (53 वर्षे), प्रणिता संदीप रसम (35 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
तर 9 जण जखमींमध्ये नारायण भिकाजी कांबळे, मंगेश मुकुंद दुखांडे, ज्योती विष्णू शिर्के, प्रशांत दत्ताराम लाड, शीतल प्रकाश हाडवे , दिनेश विनायक सावंत, पूर्वा संदीप रसम, प्रताप गोपाळ कोरपे, रवींद्र सेवाराम घाडीगावकर आणि रामदास शंकर रूपे यांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक दृश्ये –
भांडुप बस अपघातप्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाचा ताबा सुटल्याने, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात रस्त्याच्या कडेला उभे असलेले प्रवासी अचानक मागे येणारी बस पाहून जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. या फुटेजमध्ये बसच्या चाकाखाली एक व्यक्ती चिरडल्याचे धक्कादायक दृश्य स्पष्टपणे कैद झाले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.






