नवी दिल्ली, 25 जानेवारी : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आज भारतात आगमन झाले असून उद्या 26 जानेवारीला ते प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणारे ते सहावे नेते असतील. 1976 सालापासून भारताने फ्रान्सच्या राष्ट्रपतींना प्रजासत्ताक दिनासाठी एकूण पाच वेळा आमंत्रित केले आहे.
75 वा प्रजासत्ताक दिन –
दरवर्षी, भारतात प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. यंदा आपण 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे, प्रजासत्तादिनानिमित्त संरक्षण क्षमतेचे भव्य प्रदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय लष्कर, वायुसेना, नौदल, पोलिस आणि निमलष्करी दलांच्या रेजिमेंट्स दिल्लीच्या कर्तव्य पथावर म्हणजे, राजपथावर मार्चिंग करणार आहेत. तसेच वायु दलाचा क्षेपणास्त्र, विमाने, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणारा स्काय शोसुद्धा असणार आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य काय? –
देशात उद्या साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी ‘विकसित भारत’ आणि ‘भारत-लोकशाहीची जननी’ अशी थीम ठरवण्यात आली आहे. या वर्षीच्या परेडमध्ये महिला पथकाच्या संचलनाकडे विशेष लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच शंख, नगाडे यांसारख्या भारतीय वाद्यांचा समावेश असलेले 100 महिलांचे एक पथक या परेडमध्ये सहभागी होणार आहे. या पथकात सीआरपीएफमधील महिलांच्या तुकडीचाही समावेश असेल. याशिवाय फ्रान्सच्या 33 जणांचा समावेश असलेले बँड पथक आणि 95 जणांचा समावेश असलेले मार्चिंग पथकही यावर्षीच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे.
हेही वाचा : Maratha Reservation : मोर्चासाठी आझाद मैदानची परवानगी नाकारली, मनोज जरांगे आंदोलनावर ठाम