धुळे : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याच्या घटनेने धुळ्यात खळबळ उडाली आहे.
मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरव माने असे 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तो धुळे शहरातील चितोड रोड परिसरात रहिवासी होता. धुळे शहरात ही घटना काल घडली. हत्या प्रकरणानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील 28 नंबर शाळेसमोर एका सिमकार्ड विक्रेत्याला गौरव माने हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. त्यावेळी त्याला त्याचाच मित्र जयेश वाकडेने सिम कार्ड विक्रेत्याला त्रास देऊ नको, असे म्हणत समज दिली. यावरुन दोन मित्रांमध्येच वादाची ठिणगी पडली. सिमकार्ड विक्रेत्याला पैसे मागणाऱ्या गौरव माने याने मित्र जयेश पाकळेला व त्याच्या भावाला शिवीगाळ केली. या किरकोळ वादातून जयेश पाकळेने धारदार शस्त्राने गौरव मानेवर वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या जयेश पाकळे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धुळे शहर पोलीस संशयित आरोपी असलेल्या जयेश पाकळे आणि त्याच्या भावाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! अज्ञात वाहनाच्या धडकेत काका-पुतण्या ठार, पाचोऱ्यातील नेमकी घटना काय?