जळगाव, 11 एप्रिल : केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून, या स्थानकांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव आणि पाचोरा इत्यादी या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, येथे वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स, डिजिटल डिस्प्ले प्रणाली आदी आधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव आणि पाचोरा या स्थानकांवरही पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
यासाठी केंद्र सरकारकडून खालील प्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे:
- चाळीसगाव स्टेशन – 35 कोटी रुपये
- अमळनेर स्टेशन – 29 कोटी रुपये
- धरणगाव स्टेशन – 26 कोटी रुपये
- पाचोरा जंक्शन – 28 कोटी रुपये
- भुसावळ स्टेशन – (यामध्ये समाविष्ट असून निधी स्वतंत्रपणे घोषित नाही)

‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत स्थानकांचे सौंदर्यीकरण, प्रवेशद्वारांचे आधुनिकीकरण, शहराशी सुसंगत दळणवळण व्यवस्था, तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असून, स्थानिक विकासाला देखील चालना मिळेल.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा : गुंतवणूक परिषद म्हणजे जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार – पालकमंत्री गुलाबराव पाटील