भुसावळ, 22 ऑगस्ट : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मध्यप्रदेशातील एका इसमाला गांजा तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनारसिंग वालसिंग भिलाला (वय 30, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
पोलिसांनी नेमकी कशी केली कारवाई? –
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे यांना 22 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वाजून 55 मिनिटांनी माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या होंडा शाइन मोटारसायकलवरून भुसावळ शहरात गांजाची अवैधरित्या वाहतूक करीत आहे. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार स्था.गु.शा.चे पथक भुसावळकडे रवाना झाले.
View this post on Instagram
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनीही आपल्या पथकासह छाप्यात सहभाग घेतला. हॉटेल सुरुची इनजवळ नॅशनल हायवेवरील सर्व्हिस रोडवर संशयित दिसताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल –
अटक केलेल्या संशियत आरोपी अनारसिंग वालसिंग भिलाला याच्याकडून 2 लाख 5 हजार 500 रूपये किंमतीचा 10 किलो 275 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. यासोबतच 75 हजार रूपये किंमतीची होंडा शाइन मोटारसायकल (क्र. MP-09-VM-4395) तसेच 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हँडसेट देखील जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 2 लाख 90 हजार 500 रूपये इतकी आहे. दरम्यान, या प्रकरणी पो.कॉ. विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात NDPS Act 1985 कलम 20(ब), 22 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई –
सदरची कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधीकारी भुसावळ उपविभाग संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ बाजरपेठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील पो.उप.निरी.शरद बागल, श्रे.पो.उप.निरी.रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, संदिप चव्हाण, उमाकांत पाटील, पो.ना.विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चा.पो.कॉ. महेश सोमवंशी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, पो.कॉ. हर्षल महाजन, पो.कॉ. परेश बि-हाडे सर्व नेम, भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. यांच्या पथकाने केली.