पणजी, 8 ऑक्टोबर : गोवा सरकारने स्वच्छ, शाश्वत आणि कार्बन-न्यूट्रल भविष्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवी व अक्षय ऊर्जा संचालनालय (DNRE) आणि गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (GEDA) यांच्या वतीने, GIZ संस्थेच्या सहकार्याने गोवा क्लीन एनर्जी रोडमॅप 2050 या अंमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन मॅरियट हॉटेल, मिरामार येथे करण्यात आले. या कार्यशाळेत ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ, धोरणकर्ते आणि विविध विभागांचे प्रतिनिधी एकत्र येऊन गोव्याच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची दिशा निश्चित केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, “गोवा क्लीन एनर्जी रोडमॅप 2050 हा केवळ दस्तऐवज नसून, गोव्याला हरित, स्वच्छ आणि ऊर्जाक्षम बनविण्याचा सामूहिक संकल्प आहे. हा आराखडा नवकल्पना, सहकार्य आणि जनसहभागाद्वारे स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करण्याचा आराखडा आहे. प्रत्येक शासकीय विभागाने समन्वयातून कार्य करावे आणि नेट पॉझिटिव्ह पंचायत, इनोव्हेटिव्ह सोलर अप्लिकेशन्स तसेच बायो-एनर्जी प्रोग्राम्स सारख्या उपक्रमांना गती द्यावी. GIZ च्या तांत्रिक सहकार्याद्वारे क्षमता वाढवून एकात्मिक विकासाचा मार्ग निर्माण करूया.”
कार्यशाळेत नेट पॉझिटिव्ह पंचायत रिपोर्टचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश गोव्याच्या प्रत्येक पंचायतीला स्वयंपूर्ण, शाश्वत आणि ऊर्जा-पॉझिटिव्ह बनविणे हा आहे. तसेच गोवा रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी प्लॅनिंग रिपोर्ट ही प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामध्ये सौर, वारा आणि जैवइंधन क्षेत्रातील संभाव्य ऊर्जेचे विश्लेषण करण्यात आले आहे. याशिवाय DNRE, GEDA आणि SELCO फाउंडेशन यांच्यात 25 आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यात 20 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 5 सामुदायिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे, ज्यामुळे आरोग्य क्षेत्रात स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा सुनिश्चित होईल.
कार्यक्रमाचा समारोप गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक गौरेश पिळगावकर यांनी आभार प्रदर्शनाने केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये DNREचे संचालक सोहन उस्कैकर, GEDAचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर, GIZ चे प्रतिनिधी मनोजकुमार महाता तसेच SELCO फाउंडेशनच्या असोसिएट डायरेक्टर रचिता मिश्रा यांचा समावेश होता.