मुंबई, 26 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तत्पुर्वी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर आता उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती –
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध ठिकाणी मूक मोर्चे काढण्यात आले होते. यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि आमदार सुरेश धस यांनी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
उज्वल निकम यांची प्रतिक्रिया –
ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली असून ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मला विचारणा केली. मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्यागाच्या आंदोलनाला बसणे मला योग्य वाटले नाही. म्हणून, मी काल मुख्यमंत्र्यांना कळवले मी खटला चालवायला तयार आहे.
दरम्यान, राजकारण आणि वकील या दोन्ही वेगळ्या बाबी असून राजकीय टीकेची मला गंमत वाटते. न्यायासाठी मी लढणारा आहे, हे महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या जनतेला माहीत असून पोपटगिरी करणाऱ्या लोकांना पोपटगिरी करू द्या, त्यांना मी भीक घालत नाही. असेही निकम यांनी म्हटले. यासोबतच देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये. तसेच राजकीय लोकांच्या चिथावणीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहनही निकम यांनी देशमुख कुटुंबीयांना केले आहे.
हेही पाहा : Buldhana Hairfall: तुमच्या जिल्ह्यातही घडू शकते अशी केसगळतीची घटना?, डॉ. हिम्मतराव बावस्कर Interview