जळगाव – स्मशानभूमीत गेल्यावर पहिली शिवी ही सरपंचाला मिळते. ‘काय गावना सरपंच, साधी स्मशानभूमी नही तेना गाव मा, काय ठिकाना हे तेना गाव मा’, असे लोक म्हणतात. गावाची ओळख ही गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयापासून होते. ज्या गावात ग्रामपंचायतीचं कार्यालय सुंदर, त्या गावाचे सरपंच आणि जनतेचे विचार सुंदर. जो गावाचं नशिब बदलतो ते खरा सरपंच, असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजना’ च्या विशेष जन सुविधा अनुदान अंतर्गत प्रशासकीय मान्यता वितरण व घरकुल धारकांना जागा वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. आज 29 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –
यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मी नेहमी विनोदाने म्हणतो, ज्याने पाप केलंय तो सरपंच होतो. कारण काही सरपंच प्रचंड काम करतात पण पुढच्या वेळी निवडून येत नाही. मी बरेच सरपंच असे पाहिले, पण पुढच्या वेळेस त्यांचे पॅनेल पडले. ग्रामपातळीवर सुद्धा सामाजिक विचार करण्याची लोकांची मानसिकता बददली पाहिजे. जो काम करेगा वही राज करेगा, अशी मानसिकता लोकांमध्ये झाली पाहिजे, याशिवाय विकासाचे पर्व चालू शकत नाही. यावर्षी 40 ग्रामपंचायती आपण देत आहोत. जो सुंदर ग्रामपंचायत बांधेल त्याला आम्ही 25 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. नंबर 2 च्या ग्रामपंचायतीला 15 लाख आणि तीन नंबरच्या ग्रामपंचायतीला 11 लाख रुपयांचं बक्षीस आम्ही ठेवलं आहे.
काय ठिकाना हे तेना गाव मा –
सत्ताधारी सरपंचाने मी पूर्ण गावाचा सरपंच आहे, असा विचार करावा. ही भावना ठेवल्यावर 100 टक्के आपल्या ग्रामपंचायतीचा विकास होईल. आपण जगण्याचा विचार करतो पण मरण्याचाही विचार केला पाहिजे. जाताना तरी चांगल्या जागेत गेला पाहिजे. स्मशानभूमीत गेल्यावर पहिली शिवी ही सरपंचाला मिळते. ‘काय गावना सरपंच, साधी स्मशानभूमी नही तेना गाव मा, काय ठिकाना हे तेना गाव मा’, असे लोक म्हणतात. गावाची ओळख ही गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयापासून होते. ज्या गावात ग्रामपंचायतीचं कार्यालय सुंदर, त्या गावाचे सरपंच आणि जनतेचे विचार सुंदर. जो गावाचं नशिब बदलतो ते खरा सरपंच, असे मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे , जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.