जळगाव, 9 फेब्रुवारी : मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत शिक्षणमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशेष आवाहन केले आहे.
पालकमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन –
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा महत्वाचा आधारस्तंभ आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जातील, यासाठी जिल्हा प्रशासन त्यांच्या सोबत आहे. भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करावे, असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांना सकारात्मक मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील –
याशिवाय, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. राज्यात कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे शिक्षणाला पुढे नेऊया, असे आवाहन करत पालकमंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 21 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेस सुरुवात होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत ही परीक्षा पार पडणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.राज्य मंडळाने यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याच निर्णय घेतला असून परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत