भंडारा : भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये राज्यस्तरीय दुसरा क्रमांक तसेच कार्बन नुट्रल राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे काल प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे राज्यस्तरीय दुसरा क्रमांक संजय सावकारे यांच्या हस्ते बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच इतर सदस्यांना सन्मानित करण्यात आले. हे गावकऱ्यांच्या कष्टाचे आणि एकीचे फलित आहे, असे प्रतिपादन सरपंच शारदा गायधणे यांनी केले. तसेच सदर सन्मान अभियानात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी पूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकरी तसेच कर्मचारी यांना समर्पित असल्याचे त्या म्हणाल्या.
पोलीस ग्राउंड भंडारा येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हाधिकारी संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पंचायतींचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या पंचायत राज विभाग वतीने नवरत्न संकल्पनेचा अवलंब केला आहे. नवरत्न संकल्पना प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी गतवर्षीपासून पंचायत राज संस्थासाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
यामध्ये राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हातील बेला ग्रामपंचायतला नवी दिल्ली येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते नुकताच कार्बन नुट्रल विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्बन न्यूट्रल पंचायत विशेष पुरस्कार या ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे या ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. यावेळी बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा मधुकर गायधणे-शेंडे, ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी डॉ. संघमित्रा कोल्हे (गटविकास अधिकारी), उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी, उपसरपंच अर्चना प्रकाश कांबळे हे उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळविण्यासाठी वि. अ. प्रमोद हुमणे, प्रमोद तिडके, सदयसगण सर्वश्री धनराज गाढवे, विनोद नागपुरे, अर्चना पंचबुद्धे, रजनीताई बाभरे, बबिता चवरे, सुप्रिया शेंडे, मनीषा इंगळे, वंदना कुथे, राकेश मते, श्रीकृष्ण वैद्य, स्नेहल मेश्राम,सोपान अजबले, पोलीस पाटील, भिवंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष नागपुरे, जि. प. शाळा, सावित्रीबाई फुले विद्यालय, महेंद्र कनिष्ठ महाविद्यालय, रॉयल पब्लिक स्कूल, st. पीटर स्कूल, आवसिस स्कूल, ई शाळेचे शिक्षक वृंद, बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, उमेदच्या कार्यकर्ते व सर्व गावकरी यांनी सहकार्य केले.
हेही पाहा : Special Interview: गावाला राष्ट्रीय पातळीवर नेत कोट्यवधी रुपयांचं बक्षीस मिळवून देणाऱ्या महिला सरपंच