जळगाव, 31 ऑगस्ट : “लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून, सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य केल्यास हे अभियान घराघरात पोहोचवता येईल. ग्रामविकास विभागाकडे मोठी यंत्रणा आहे. सरपंच, ग्रामसेवक व अधिकारी यांनी हे अभियान स्वतःचे समजून पुढाकार घेतला तर प्रत्येक गाव विकासाच्या मार्गावर झेपावेल. गावाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा ही खरी संसद असून ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी शाळा आहे. सरपंचांनी गाव केंद्र मानून आत्मीयतेने काम करा,” असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
‘….तर गावांचा सर्वांगीण विकास साधता येतो’ –
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “सरपंच व ग्रामसेवक यांनी गाव विकासाची युती करून काम करावे. सरपंचाची भूमिका ही न्यायिक असावी. विरोधकांना सोबत घेऊन काम करणारा सरपंचच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. ग्रामपंचायतीचा प्रत्येक सरपंच हा त्या गावाचा मुख्यमंत्री असतो. राजकारणातील वैरभाव कमी करून विरोधकांना विश्वासात घेतल्यास गावांचा सर्वांगीण विकास साधता येतो. पंचायत ही विकासाची खरी शिदोरी बनली पाहिजे. या अभियानात विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळे व महिला बचत गट यांना सहभागी करून घ्या. आपण सर्वांनी मिळून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ यशस्वी करूया आणि प्रत्येक गावाला समृद्धीचं केंद्र बनवूया,” असेही पालकमंत्री पाटील यांनी आवाहन केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले? –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, “प्रत्येक विकासकामाचे नियोजन असणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने पारदर्शक कारभार ठेवून विकासकामांना गती द्यावी. जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व उपक्रमांमध्ये जळगाव जिल्हा उल्लेखनीय प्रगती करत आहे. या अभियानात देखील जिल्ह्याची कामगिरी निश्चितच उत्तम असेल असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल काय म्हणाल्या? –
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, “माझा गाव, माझा विकास” या भावनेतून प्रत्येक सरपंच व ग्रामसेवक यांनी कार्य करणे गरजेचे आहे. जळगाव जिल्हा परिषद या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करत असून येत्या काळातही जिल्हा प्रगतीपथावर वाटचाल करणार असल्याचे सांगितले.
ISO प्राप्त 56 ग्रामपंचायतींचा सन्मान –
याप्रसंगी जिल्ह्यातील ISO मानांकन मिळालेल्या 56 ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नेरी (ता. जामनेर), पाळधी व मुसळी (ता. धरणगाव) यांच्यासह इतर ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. यावेळी समृद्ध पंचायतराज अभियान पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेचमुख्यमंत्री १५० दिवस सुधारणा कार्यक्रमाच्या अंतरिम मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती –
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, मनपा आयुक्त श्री. ढेरे, जिल्हा परिषदेचे संबंधित सर्व विभाग प्रमुख यांच्यासह विविध अधिकारी व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी केले, तर आभार प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांनी मानले.