चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 14 मार्च : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील दोनही मतदारसंघात भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केल्याने जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रावेर मतदारसंघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील? –
गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुती म्हणून ते जे उमेदवार देतील, त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत. रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांच्या नावाच्या चर्चा असून रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली तर बारामतीप्रमाणे रावेरमध्येही नणंद-भावजय असा सामना पाहायला मिळू शकेल, असे मंत्री पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील बांभोरी गावात विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
रावेर मतदरासंघाची नेमकी काय स्थिती –
भाजपकडून काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, रक्षा खडसेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर, खान्देशात चार खासदारांच्या जागा, कुणाकुणाला मिळाली संधी?