जळगाव, 19 जानेवारी : राज्यातील महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही पुन्हा एकदा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया –
एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही सर्व अंवलबून होतो. त्यांनी जो निर्णय घेतला त्याप्रमाणे आम्ही काम करत आलोय आणि शिंदे साहेबांनी विश्वास दाखवल्यामुळे पुन्हा एकदा जळगावचे पालकमंत्री देण्यात आलंय. मागचे पाच वर्ष मी पालकमंत्री होतो. पण आमदार, खासदार तसेच संबंधित जे मंत्री होतो, त्यांच्यासोबत समन्वय साधूनच मी जिल्ह्याची कामे केली आणि त्याचीच फलश्रूती म्हणून आज मला हे पालकमंत्रीपद मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केली.
गुलाबराव पाटील यांचा सवाल –
गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, दादा भूसे तसेच भरतशेठ गोगावले यांना देखील पालकमंत्री द्यायला पाहिजे होते. कारण, असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलं, याबाबत आम्ही एकनाथ शिंदे यांना विचारणा करू. दरम्यान, त्यांच्यासाठी आम्ही जे काही केलंय त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे भाजपचे नाव न घेता ते म्हणाले आहेत. आमचे जे दोन शिलेदार आहेत. त्यांना पालकमंत्रीपद का नाही? याची निश्चितपणे विचारणा झाली पाहिजे, असेही मंत्री पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील यांची पालकमंत्रीपदाची हॅट्रीक –
शिवसेनेतील जेष्ठ नेते मंत्री गुलाबराव पाटील ह्यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे सलग तीन वेळा मिळाले आहे. पहिल्यांदा महायुती नंतर महाविकास आघाडी तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुन्हा महायुती सरकारमध्ये गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे सलग तिसऱ्यांदा पालकमंत्री झाले आहे. यामुळे गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या पालकमंत्रीपदाची हॅट्रीक केलीय.