मुंबई, 3 ऑक्टोबर : आगामी विधानसभआ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताय. माजी मंत्री तथा आता भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेण्याचे ठरविल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपला पुन्हा एकदा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
हर्षवर्धन पाटील हाती घेणार तुतारी –
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा सहभाग झाल्यामुळे महायुतीमधील नियमाप्रमाणे विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी ती जागा जाणार असल्याचे दिसत असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता मावळली असून त्यांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलंय. हर्षवर्धन पाटील हे पुढील 4 ते 5 दिवसांत तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या लेकीने स्टेटवर तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याचे दिसून आले.
शरद पवार यांची घेतली भेट –
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली असून उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणा करणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे त्यांची कन्या अंकिता यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया –
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशावर बोलताना सांगितले की, राजकारणात महत्वकांक्षा असतात. हर्षवर्धन पाटलांचे चुकीचे सुरू आहे असं मी म्हणणार नाही. दरम्यान, भाजपमध्ये तिकीट मिळणार नाही, असे वाटणारे आता दुसऱ्या पक्षात चालले. जेव्हा महायुतीचे सरकार येईल तेव्हा ते पश्चाताप करतील, असा टोलाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महिला सुरक्षेवर परखड मत, जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष मुलाखत