चंदीगड : 5 ऑक्टोबरला हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकूण 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. एक्झिट पोलचा विचार केला असता जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या बाजुने कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मागील 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. आज हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता निकाल काय लागतो? कोणत्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतील? कोणत्या पक्षाचं सरकार हरियाणामध्ये येणार? हे आता पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
90 विधानसभा मतदारसंघ, 93 मतमोजणी केंद्र :
2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 90 विधानसभा मतदारसंघांसाठी 93 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये बादशाहपूर, गुरुग्राम आणि पतौडी विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्रे आणि उर्वरित 87 विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक मतमोजणी केंद्र बनवण्यात आले आहे. तसेच मतमोजणी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 90 मतमोजणी निरीक्षकांचीही नियुक्ती केली आहे, अशी माहिती हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी दिली.
मतमोजणीला सुरुवात : हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळते आहे. भाजपा 5 तर काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला आहे.
मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था : आज हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतमोजणी होत आहे. यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यभरात स्थापन करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रांवर सुमारे 12 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच 93 मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाच्या 30 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रांवर तीन स्तरीय सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वात आतल्या सुरक्षा वर्तुळात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.