मुंबई, 21 जुलै : राज्यातील विविध भागात आज अतिमुसळधार पाऊस पडतोय. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आप्तकालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
राज्यात अतिमुसळधार पाऊस –
मुंबई, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा यासह राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडलाय. चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुट गावालगतच्या रेड अर्थ रिसॉर्टमध्ये अडकलेल्या 2 पर्यटक आणि 8 कर्मचाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. राज्यात पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, याठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश –
सह्याद्री पर्वत रांगांच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर अतिमुसळधार पाऊस पडत असल्याने या ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या ठिकाणी पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. तसेच रविवार असल्यामुळे वर्षा पर्यटनालाठी मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यांना धोकादायक परीस्थितीची वेळीच जाणीव करून देण्याचे आदेशही एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.
मुंबईत मुसळधार पाऊस –
मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल शनिवारपासून मुंबईत सतत पावसाची संततधार सुरू असल्याने मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे लोकलवर परिणाम झाला असून सेंट्रल रेल्वेवरील लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहेत. अंधेरी सब-वे बंद करण्यात आला असून वाहतुकीचे मार्ग वळवल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना किनारी भागात जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.
जळगावचा काय आहे हवामान अंदाज? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाला विश्रांती मिळाली असून प्रलंबित असलेल्या शेतीकामांना वेग आलाय. असे असतानाही शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही पाहा : Special Interview : ‘त्या’ शाळांना आरटीईची प्रक्रिया राबवावीच लागेल – अॅड. दीपक चटप यांची विशेष मुलाखत